मुंबई : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणाने राजकीय वाद तापला असताना, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवारांनी राम शिंदे आणि निलेश घायवळ यांच्यातील हितसंबंध असल्याचा दावा करत, शिंदे यांनीच घायवळला परदेशात पळून जाण्यास मदत केल्याचे सांगितले होते.
या आरोपांना प्रत्युत्तर देताना राम शिंदे यांनी मंगळवारी (१४ ऑक्टोबर) एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना उलट आरोप केला की, निलेश घायवळला महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोहित पवारांनीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला होता. या दाव्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
‘ते बिनसलेले व्यक्तिमत्व, धादांत खोटे बोलत आहेत’
राम शिंदे यांनी रोहित पवार यांना “बिनसलेले व्यक्तिमत्व” संबोधून त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “रोहित पवार हे दररोज खोटं बोलण्याचं काम करतात. निलेश घायवळ प्रकरणात ते धादांत खोटे बोलत आहेत आणि आता तोंडघशी पडले आहेत,” असा फटका शिंदे यांनी लगावला. त्यांनी स्पष्ट केले की, “माझा आणि निलेश घायवळचा दूरपर्यंत एकमेकांशी संबंध नाही. रोहित पवारांनीच घायवळला २०१९ साली कर्जत-जामखेड मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात उतरवले होते. त्यांच्या स्वार्थासाठी रोहित पवारांनी घायवळला आणले आणि मला पाडण्याचा प्रयत्न केला.”
शिंदे यांनी पुढे सांगितले की, “रोहित पवारांचे वडील निलेश घायवळच्या घरी गेले होते. या सगळ्यांच्या मगरपट्ट्यात बैठका झाल्या. मात्र, नंतर त्यांचं कशावरून बिनसले, ते मला माहित नाही. पण रोहित पवार यांचे निलेश घायवळ यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. रोहित पवारांच्या आई-वडिलांसोबत निलेश घायवळचे फोटो आहेत. त्यांचे फोटो दाखवले तर ते समाजकार्य होते, दुसऱ्यासोबत फोटो निघाले की ते गुंड होतात. रोहित पवार यांचे हे वर्तन चुकीचे आहे.”
२०२० मध्ये मविआ सरकारच्या काळात मिळाला
राम शिंदे यांनी निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देत सांगितले की, “तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि मी निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी मदत केली, हा रोहित पवारांचा आरोप धादांत खोटा आहे. २०२० मध्ये निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला होता. घायवळच्या मातोश्रीने स्पष्ट सांगितले आहे की, रोहित पवारांनी अनिल देशमुखांच्या माध्यमातून हा पासपोर्ट मिळवून दिला. हा महाविकास आघाडीच्या काळातील प्रकार आहे.”


