पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचारांना आता राजकीय नेतेही बळी पडत असल्याचं चित्र पुण्यात समोर आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून धक्काबुक्की आणि मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ही घटना पुण्यातील फुरसुंगी येथील द्वारकाधीश गोशाळेजवळ घडली आहे. या प्रकरणाने शेतकरी आणि गोरक्षकांमधील वाढता तणाव पुन्हा उफाळून आला असून, सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नेमकं काय घडलं?
सदाभाऊ खोत हे कार्यकर्त्यांसह गोशाळेत गेले होते. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या १० म्हशी आणि त्यांच्या ११ पाडसांचा शोध घेण्याचा त्यांचा हेतू होता. या जनावरांना दोन महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मारहाण करून जबरदस्तीने गोशाळेत नेलं होतं. शेतकऱ्यांनी न्यायालयात जाऊन जनावरं परत मिळवण्यासाठी आदेश मिळवले होते.
मात्र, गोशाळेत पोहोचल्यावर ते जनावर आता तिथे नसल्याचं उघड झालं. गोरक्षकांनी “म्हशींना चरायला डोंगरावर सोडलं, त्या निघून गेल्या” असं उडवाउडवीच उत्तर दिलं. सदाभाऊ खोत यांनी याबाबत गोरक्षकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या वक्तव्यावरूनच ते आक्रमक झाले आणि आमदार खोत यांना धक्काबुक्की करून राडा उडवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर बोलताना सदाभाऊ खोत यांनी राज्यातील गोवंश कायद्याच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाची पोल खुली केली. “शेतकरी दुधाळ जनावरं विकायला गेल्यानंतरही त्यांना मारहाण केली जाते. जनावरं जबरदस्तीने पोलीस स्टेशननंतर गोशाळेत नेली जातात आणि दिवसाला २०० ते ५०० रुपये आकारले जातात.
वर्षभर किंवा दीड वर्ष चाललेल्या खटल्यात शेतकरी दंड भरू शकत नाहीत, त्यामुळे जनावरं परत मिळत नाहीत. गोरक्षणाच्या नावाखाली एक मोठी लॉबी आणि कॉर्पोरेटसारखी व्यवस्था सुरू आहे. सरकारने या गोरक्षकांवर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा, पोलीस स्टेशनसमोर आम्ही जनावरांच्या छावण्या उभ्या करू,” असा इशारा त्यांनी दिला.


