पॅरिस : आजपासून पॅरिसमध्ये सुरू होणाऱ्या बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत लक्ष्य सेन, पी. व्ही. सिंधू या तारांकित खेळाडूंसोबत भारतीय बॅडमिंटनपटूंची परीक्षा पाहण्यास मिळेल. २०२३ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा एचएस. प्रणॉयच्या खेळावर सर्वांच्या नजरा असतील.
२४ वर्षीय सेनला पहिल्याच फेरीत अव्वल मानांकित चीनचा शी यूशीच्या कठीण आव्हानाचा सामना करावा लागेल, तर माजी चॅम्पियन सिंधू सलामीच्या लढतीत बल्गेरियाच्या कालोयन नालबांटोवाविरुद्ध खेळताना दिसेल. प्रणॉय पहिल्या सामन्यात फिनलँडच्या जोआकिम ओल्डोफशी भिडेल. पहिला अडथळा पार केल्यास दुसऱ्या फेरीत त्याचा सामना डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनशी होऊ शकतो. पुरुष दुहेरीत नवव्या मानांकित सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पहिल्या फेरीत चाल मिळाली आहे.
मिश्र दुहेरीत, १६ व्या मानांकित ध्रुव कपिला आणि तनिषा क्रैस्टो यांनाही पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे, तर रोहन कपूर आणि रुत्विका शिवानी गाडे पहिल्या फेरीत मकाऊचे लिओंग लोक चोंग आणि वेंगची एनजीशी या जोडीचा सामना करतील. महिला दुहेरीत, प्रिया कोंजेंगबम-श्रुती मिश्रा आणि पांडा बहिणी रितुपर्णा-श्वेतापर्णा यांचा खेळ पाहण्यासारखा असेल.


