Sanjay Shirsat : राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींवर आता इतर पक्षांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीतील वादावर भाष्य करताना पार्थ पवारांवर थेट निशाणा साधला आहे.
अजित दादांच्या राष्ट्रवादीत सध्या जे काही सुरू आहे, तो अंतर्गत विषय आहे. काही दिवसांपूर्वी पक्ष विलीन होणार अशा चर्चा होत्या, मात्र आता त्या थांबल्या आहेत. उलट पक्ष फुटीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळेच सुनील तटकरे यांनी पुढाकार घेत शरद पवार यांची भेट घेतली असावी, असे शिरसाट म्हणाले.
पार्थ पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना त्यांनी, पार्थ पवार तक्रार करण्याएवढा मोठा नेता नाही. सुनेत्रा पवार यांचं स्थान वेगळं आहे. त्यांच्या पक्षात कोणाला काय जबाबदारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत अधिकार आहे, असे वक्तव्य केले.
राष्ट्रवादीतील काही नेते नाराज असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांना पक्षात काम करण्यापासून रोखलं जातं, ते वेगळा मार्ग शोधतात. त्यामुळे अनेक जण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना शिरसाट यांनी सरकार सकारात्मक असल्याचा दावा केला. शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण आहे. कांद्याला भाव देण्यात आला असला तरी प्रश्न पूर्ण सुटलेला नाही. मात्र सरकारमध्येही शेतकरी कुटुंबातील लोक आहेत, त्यामुळे योग्य निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सरकारने त्यांचा इशारा गांभीर्याने घेतला आहे. जरांगे यांनी तीन महिन्यांपूर्वीच इशारा दिला होता. सरकारने त्यांच्याशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका कायम आहे, असे शिरसाट म्हणाले.


