Indapur Election: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजताच इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाने यावेळेस कंबर कसली असून, नवीन गट रचनेनुसार महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शेळगाव-निमसाखर पंचायत समिती गणातून सुशिक्षित तरुण चेहरा म्हणून सत्यजीत रणवरे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे.
नवे समीकरण आणि आरक्षण
नवीन गट रचनेनुसार शेळगाव निमसाखर गणामध्ये शेळगाव, निमसाखर, शिरसटवाडी, रुई, मराडवाडी आणि थोरातवाडी या गावांचा समावेश होतो. या गणासाठी ‘सर्वसाधारण पुरुष’ प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये निमसाखर येथील सत्यजीत रणवरे यांनी भाजपच्या वतीने प्रबळ दावेदारी सादर केली आहे.
सुशिक्षित चेहरा आणि दांडगा जनसंपर्क
सत्यजीत रणवरे यांची ओळख एक अभ्यासू आणि सुशिक्षित तरुण नेतृत्व म्हणून आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे. परिसराची सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक जाण तसेच सर्वसामान्यांशी असलेली त्यांची नाळ ही त्यांच्या उमेदवारीसाठी जमेची बाजू मानली जात आहे. प्रशासकीय कामांचा अनुभव आणि लोकांमधील सक्रियता यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नावाची मोठी चर्चा आहे.
पक्षीय ताकद आणि नेतृत्वाचा विश्वास
रणवरे हे भारतीय जनता पार्टीचे इंदापूरचे युवा नेते प्रवीण माने, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे आणि तालुकाध्यक्ष राजकुमार जठार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. पक्षातील एक सर्वसमावेशक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने, भाजप त्यांना या गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंदापूर तालुक्यात भाजपने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली असून, रणवरे यांच्या रूपाने पक्षाला एक नवा आणि प्रभावी चेहरा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


