Solapur Election Results : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने एकतर्फी वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजयाकडे कूच केली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, भाजपच्या लाटेत काँग्रेसचे दिग्गज उमेदवार भुईसपाट झाले आहेत.
प्रभाग २३ मध्ये भाजपचा ‘क्लीन स्वीप’
सोलापुरातील प्रभाग क्रमांक २३ मध्ये भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या प्रभागातील भाजपचे सर्व उमेदवार सत्यजित वाघमोडे, आरती वाकसे, ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
दोन माजी महापौरांना धूळ चारली
या निवडणुकीत सर्वात मोठा उलटफेर माजी महापौरांच्या निकालात पाहायला मिळाला. प्रभाग २२ मधून काँग्रेसचे माजी महापौर संजय हेमगड्डी यांना भाजपच्या दत्तात्रय नडगिरे यांनी पराभूत केले. तर, प्रभाग २३ मधून शिवसेना (ठाकरे गट) च्या माजी महापौर अलका राठोड यांना भाजपच्या ज्ञानेश्वरी देवकर यांनी पराभवाचा धक्का दिला. दिग्गज नेत्यांच्या या पराभवामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – PMC Election Result 2026: मोठी बातमी! पुण्यात प्रशांत जगताप यांचा विजय, तर भाजपचे 3 उमेदवार विजयी
काँग्रेस भुईसपाट; भाजपची बहुमताकडे वाटचाल
सोलापूर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार स्पर्धेतही असल्याचे दिसत नाहीयेत. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यासाठी हा निकाल अत्यंत निराशाजनक ठरला आहे. आतापर्यंत भाजपचे २४ उमेदवार विजयी झाले असून १५ जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३ जागांवर तर शिवसेना १ जागेवर आघाडीवर आहे.
राजकीय पार्श्वभूमी आणि सत्तासमीकरणे
सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. २०१७ मध्ये भाजपने ४९ जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती, तर शिवसेना २१ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र, २०२६ ची ही निवडणूक रस्ते, पाणी आणि विकासकामांच्या मुद्द्यांवर तसेच शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतरच्या बदललेल्या समीकरणांमुळे महत्त्वाची ठरली. सध्याचे कल पाहता भाजप पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्तेवर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


