Weather Update : राज्यात हवामानात मोठा उलटफेर पाहायला मिळत असून एका बाजूला मुंबईत उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे विदर्भासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे वातावरणात बदल झाला असून सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाले आहे. त्याचबरोबर पश्चिमेकडून येणाऱ्या ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभावही जाणवत आहे. या दुहेरी परिणामामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत किमान तापमानात सुमारे 4 अंशांची घट होऊ शकते, तर कमाल तापमानात 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही काळ तापमानात घट होऊन पुन्हा वाढ होण्याचा अंदाज आहे.
आज विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह तुरळक सरींची शक्यता आहे. 29 मार्च रोजी कोकण वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच 30, 31 मार्च आणि 1 एप्रिलदरम्यान राज्यभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे मका पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातही अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
बारामती शहरातही काल सायंकाळी अचानक वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दिवसभराच्या उकाड्यानंतर आलेल्या या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.


