Baramati News : बारामती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी राजकीय खेळी करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची माघार घडवून आणली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या लढतीत आता मुख्यतः काँग्रेसचं आव्हान उरणार आहे.
सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी माघार घेतल्याचे जाहीर केले.
बारामतीत झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री दत्तात्रय भरणे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हाके यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, विविध नेत्यांकडून आलेल्या विनंतीनंतर आपण माघार घेतली असली तरी ओबीसींच्या प्रश्नांवर आपली भूमिका कायम राहणार आहे.
हाके यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उदय सामंत यांच्याकडूनही संपर्क झाल्याचे सांगितले. तसेच सुनेत्रा पवार यांचाही फोन आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी हाके यांना विनंती करण्यात आली होती. चर्चेनंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत माघार घेतली.
या घडामोडीनंतर बारामतीतील राजकीय समीकरणे बदलली असून आता सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेस उमेदवाराचे थेट आव्हान उभे राहणार आहे.


