पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांच्यासह २२ माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आहे.
या प्रवेशामध्ये माजी नगरसेवक विकास दांगट, बाळा धनकवडे, माजी नगरसेविका सायली वांजळे, रोहिणी चिमटे तसेच राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांचा समावेश आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील हे २२ दिग्गज नेते एकाचवेळी कमळ हाती घेणार आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश शरद पवार गटाची ताकद कमी करणारा ठरला आहे.
पुण्यात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झाल्याचे चित्र आहे. शुक्रवारी भाजपची पुण्यात महत्वाची बैठक झाली, ज्यात या मेगा प्रवेशाबाबत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात आज अनेक नेत्यांचा प्रवेश होईल, तर पुढील टप्प्यातील प्रवेश लवकरच जाहीर होणार आहेत.
दरम्यान, भाजपचे राज्य निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील भाजप नेत्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. महापालिकेत १२० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. प्रभागस्तरावर कार्यक्रम, मेळावे, युनिट नेमणूक आणि टेक्निकल टीमची स्थापना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भाजप आणि शिवसेनेची संयुक्त बैठक झाली असून, महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवली जाईल. जागावाटप आणि इतर मुद्द्यांवर पुढील बैठकीत चर्चा होईल. पुणे शहरात भाजपचे संख्याबळ मजबूत असल्याने १२० पेक्षा अधिक जागा जिंकू, असा विश्वास शहर निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी व्यक्त केला. इलेक्टिव्ह मेरिटनुसार शिवसेनेला जागा दिल्या जातील.


