इंदापूर : विद्या प्रतिष्ठान संचलित पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे १९ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या अॅम्फीथिएटर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे तसेच सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
उद्घाटनानंतर श्रद्धा गलांडे हिने जोशपूर्ण ‘शिवगर्जना’ देत कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. तिच्या दमदार घोषणेमुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला.पुढे श्रावणी दिवसे, शिवांजली पाटील आणि गौरी जामदार यांनी प्रभावी व रोमांचक बेसिक लाठीकाठीचे सादरीकरण केले. त्यानंतर समीक्षा कुलाळ हिने शिवचरित्रावर आधारित स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर गोपाळ गवळी आणि सुजल पोपळे यांनी अँडव्हान्स लाठीकाठीचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात ओम फाळके आणि अश्विनी बनसोडे यांनी आपल्या सुरेल आवाजात पोवाडा गायन सादर करून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी आपल्या विस्तृत आणि प्रभावी भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शिवरायांचे जीवन हे केवळ इतिहास नसून ते नेतृत्व, शिस्त, दूरदृष्टी, स्त्री-सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि सुशासन यांचे जिवंत उदाहरण आहे. “आजच्या तंत्रज्ञानयुगात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शिवरायांकडून संघटनकौशल्य, धैर्य, निर्णयक्षमता आणि स्वराज्याची प्रेरणा घ्यावी. कोणतेही कार्य करताना त्याचे प्रयोजन, नियोजन आणि आयोजन कसे करावे हे शिवरायांकडून शिकावे,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लाठीकाठी, कविता आणि पोवाडा या कलाप्रकारांचे विशेष कौतुक करत, “आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कला, शौर्य आणि संस्कार यांचा सुंदर संगम आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले. विविध सादरीकरणांमधून त्यांनी केवळ कलागुणांचे प्रदर्शन केले नाही, तर शिवचरित्रातील शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचे प्रभावी सादरीकरण केले. सजावट, ध्वनीव्यवस्था, शिस्त राखणे आणि कार्यक्रमाचे नियोजन या सर्व बाबींमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका सूर्यवंशी यांनी प्रभावीपणे केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा संतोष देवकाते आणि सहाय्य प्रा. सचिन पवार यांनी केले.


