निरगुडसर : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) हद्दीतील रोडेवाडी फाटा कळमजाई मंदिराजवळ भीमाशंकर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर शनिवारी ( दि. २१) दुपारच्या सुमारास पलटी झाला. ऊस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला दिसत होता.
शिरूर तालुक्यातून ट्रॅक्टर दोन ट्रॉलीमध्ये ऊस भरून भीमाशंकर कारखान्याकडे निघाला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या गाळप हंगाम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर उसाची वाहतूक सुरु आहे. ट्रॉलीमध्ये अचानक बिघाड होऊन अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या आपघातात तोडलेला ऊस रस्त्यावर विस्कटल्यामुळे शेतकऱ्याचे. मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. भीमाशंकर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली व रस्त्यावर पडलेल्या उसाच्या वाहतुकीचे तात्काळ नियोजन केले.
शाळा सुटण्याची वेळ आसल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते. मात्र मोठा अनर्थ टळला. ट्रॅक्टरला जास्त भाडे मिळण्याच्या हवेसापायी ट्रॅक्टर चालक अतिरिक्त ऊस ट्रॉलीत भरून वाहतूक करत आहेत. त्याचप्रमाणे ट्रॅक्टर वरती टेपचा आवाज मोठ्या प्रमाणात करून रस्त्यावर वाहतूक करत आहेत. कारखाना प्रशासनाने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर ड्रायव्हर यांना वाहतुकी संदर्भात योग्य त्या सूचना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.


