Maharashtra Octobar Heat : राज्यात परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. कमाल तापमानात वाढ झाल्याने ‘ऑक्टोबर हिट’चा ताप कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाला पोषक वातावरण असले तरी आज उघडिप आणि तीव्र उन्हाचा चटका कायम राहणार आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ओसरला असून, समुद्र सपाटीपासून १.५ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. काल सकाळपर्यंत राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम होता. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत पोहोचले, तर दुपारच्या वेळी सूर्यप्रकाश तीव्र होता.
रविवारी पहाटेपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३४.५ अंश तापमान नोंदवले गेले, तर मुंबईतील सांताक्रुझ येथे ३४ अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने आज उघडिप आणि उष्णतेचा अंदाज वर्तवला आहे.
मॉन्सूनने १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांतून परत फिरण्यास सुरुवात केली आहे. रविवारी अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी, रक्सौलपर्यंत मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. पुढील दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या बहुतांश भागांतून मॉन्सून पूर्णपणे परतण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


