इंदापूर : येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजने तांत्रिक शिक्षणाचा दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर देशातील नामांकित ‘लार्सन अँड टुब्रो लिमिटेड’ (L&T), मुंबई या कंपनीत स्थान मिळवले आहे.
कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची ‘डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी’ पदावर निवड झाली असून त्यांना वार्षिक ३ लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. कुमारी तृषाली तुषार घोगरे, सुरज विठ्ठल जाधव आणि आदित्य सुनील काळे अशी निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
L&T कंपनीची निवड प्रक्रिया अत्यंत कठीण मानली जाते. यामध्ये तांत्रिक मूल्यमापन (Technical Assessment), अभियोग्यता चाचणी (Aptitude Test) आणि वैयक्तिक मुलाखत अशा विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. विद्या प्रतिष्ठानमध्ये मिळणारे उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण, प्रॅक्टिकल ज्ञानावर दिलेला भर आणि उद्योग जगताच्या गरजांनुसार घेतलेले प्रशिक्षण यामुळेच या विद्यार्थ्यांनी हे यश संपादित केले आहे.
या यशाबद्दल बोलताना प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास आणि कौशल्य विकासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्थान मिळवणे ही अभिमानाची गोष्ट आहे.”
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. योगेश जाधव यांनी नमूद केले की, विद्यार्थ्यांना मुलाखत कौशल्ये आणि उद्योगाभिमुख तांत्रिक ज्ञानाचे विशेष मार्गदर्शन दिले जाते, ज्याचा फायदा या प्लेसमेंटमध्ये झाला. तसेच संगणक विभागप्रमुख प्रा. प्रफुल्ल कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि विभागातील प्राध्यापकांच्या योगदानाचे कौतुक केले.
विद्या प्रतिष्ठानचे सचिव, रजिस्ट्रार, प्रशासन, सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीमुळे इंदापूर परिसरात विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कनिष्ठ विद्यार्थ्यांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.


