Chess Tournament: इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) यांच्या वतीने आयोजित डि-2 झोन अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धा भारती विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक, पुणे येथे सोमवार, (दि.12) रोजी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथील कॉम्प्युटर विभागाच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रनर-अप (द्वितीय क्रमांक) पटकावला.
संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांची बाजी
सोमवार, १२ जानेवारी रोजी झालेल्या या अटीतटीच्या स्पर्धेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या यशस्वी संघात ओम मिठारे, आकाश मिसाळ, प्रतीक जाधव, आयुष सोनवणे आणि श्रवण कांतोडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अचूक चालींनी प्रतिस्पर्ध्यांना नमवत अंतिम फेरीत मजल मारली.
हेही वाचा – Indapur College: इंदापूर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्यावतीने पथनाट्याद्वारे संविधानाचा जागर
मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा
विद्यार्थ्यांच्या या यशामागे स्पोर्ट्स इन्चार्ज प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ, स्पोर्ट्स समन्वयक ज्ञानदेव धुमाळ आणि प्रा. प्रियंका सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्राचार्यांकडून कौतुक
विजेत्या संघाचे अभिनंदन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले की, ‘बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांची निर्णयक्षमता आणि एकाग्रता वाढते. शैक्षणिक प्रगतीसोबतच अशा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत. हे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. तथापी, पुढील टप्प्यावरील स्पर्धेसाठी महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांनी विजयी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.


