पुणे: पुणे शहरातील आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी आज जाहीर करण्यात आली. एकूण 35 लाख 51 हजार 469 मतदारांची नोंद झाली असून त्यापैकी 3 लाखांहून अधिक नावे दुबार असल्याचे समोर आले आहे. ही दुबार नावे निवडणूक आयोगामार्फत काढली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
शहरात 41 प्रभाग असून सर्वाधिक मतदार प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहेत. तेथे 1 लाख 60 हजार 242 मतदार आहेत. सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक 39 मध्ये असून तेथे 62 हजार 205 मतदार आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले असल्याने आता मतदारसंख्येची स्पष्टता आली आहे.
प्रारुप यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्ती करायची असल्यास 20 ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना नोंदवता येतील. मुख्य इमारतीतील निवडणूक कार्यालय तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांत ही सुविधा उपलब्ध राहील, असे आयुक्तांनी सांगितले.
राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच पुण्यात प्रभागनिहाय मतदारसंख्या जाहीर झाल्याने उमेदवारांच्या हालचालींना वेग येईल. दुबार मतदारांची संख्या मोठी असल्याने अंतिम यादीत आणखी बदल होण्याची शक्यता आहे.
आज जाहीर झालेल्या निवडणूक मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची खात्री करु घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


