PMC Election: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाची धाकधूक शिगेला पोहोचलेली असतानाच, पुण्यात अधिकृत निकाल हाती येण्यापूर्वीच ‘भावी महापौरांची’ चर्चा रंगली आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच शहरात भाजप नेत्यांच्या विजयाचे आणि थेट ‘महापौर’ पदाचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यात प्रामुख्याने पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख आणि वरिष्ठ नेते गणेश बिडकर यांचे नाव चर्चेत आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे सुपुत्र प्रणव धंगेकर यांच्या विरोधात बिडकर यांची हायव्होल्टेज लढत होत आहे. मात्र, निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी शहरात ‘महापौर साहेब’ असे उल्लेख असलेले बॅनर लावल्याने हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. बिडकर यांनी यापूर्वी स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते म्हणून काम पाहिलेले असल्याने, भाजपची सत्ता आल्यास ते महापौरपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
हेही वाचा – Sambhajinagar: संभाजीनगरात मतमोजणीस्थळी पोलिसांचा लाठीचार्ज; माजी महापौर जखमी, संजय शिरसाटांचा संताप
पुण्यात विजयाचे फलक
केवळ गणेश बिडकरच नव्हे, तर भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले सचिन दोडके यांच्या कार्यकर्त्यांनीही निकालापूर्वीच जल्लोष सुरू केला आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच दोडके यांच्या विजयाचे फलक पुण्यात पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी विधानसभेलाही त्यांनी अशाच प्रकारे विजयाचे बॅनर लावले होते, मात्र तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता नगरसेवक पदाची ‘हॅटट्रिक’ ते साधणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, बाणेर-बालेवाडी (प्रभाग क्रमांक ९) मध्ये भाजपचे लहू बालवडकर यांच्या विजयाचे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले असून, तिथे “जनतेचा विश्वास विजयी झाला” असा दावा करण्यात आला आहे. या प्रभागात राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून निवडणूक लढवणारे बंडखोर उमेदवार अमोल बालवडकर आणि लहू बालवडकर यांच्यातील संघर्ष अत्यंत प्रतिष्ठेचा ठरला आहे.
पुणे महानगरपालिकेत सत्ता कोणाची?
दरम्यान, पुणे महानगरपालिकेत सत्ता नेमकी कोणाची येणार, हे काही तासांतच स्पष्ट होईल. मात्र, निकालाआधीच लागलेल्या या बॅनरबाजीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कार्यकर्त्यांचा हा अतिउत्साह की नेत्यांनी विजयाबद्दल बाळगलेला प्रचंड आत्मविश्वास, याची आता जनसामान्यांत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


