पुणे: चंद्रकांत पाटील यांच्या वरदहस्तामुळेच कोथरूडमधील गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. कोथरूड परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. त्यावरून रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. धंगेकरांच्या या सततच्या टीकास्त्रामुळे भाजप आक्रमक पवित्र्यात आले आहे. धंगेकरांकडून करण्यात येणारे आरोप भाजपच्या जिव्हारी लागले असून आता त्यांच्यावर पलटवार सुरू झाला आहे.
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी धंगेकरांवर जोरदार निशाणा साधला. “ब्लॅकमेलर आहोत अशा पद्धतीने विधान करायचं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचं, ही धंगेकरांची प्रवृत्ती पुणेकरांना चांगलीच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी कोणालाही शहाणपण शिकवण्याची गरज नाही. चंद्रकांत पाटील यांच्यावर होणारी टीका भाजपचा कोणताही कार्यकर्ता आता खपवून घेणार नाही,” असा थेट इशारा घाटे यांनी धंगेकरांना दिला आहे.
कोथरूडमधील गुन्हेगारी प्रश्नावरून सुरू झालेला हा राजकीय वाद आता अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. एका बाजूला धंगेकर पाटीलांना जबाबदार धरत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून धंगेकरांना प्रत्युत्तर दिले जात आहे. पुढील काही दिवसांत या राजकीय वादळाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


