Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटात मोठा अपघात झाला आहे. मंगळवारी उशिरा रात्री रायगडहून पुण्याकडे प्रवास करणारी महिंद्रा थार वाहन नियंत्रण सुटल्याने थेट 500 फूट दरीत कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कारमधील सहा जण तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याने शोध सुरू होता. अखेर गुरुवारी सकाळी बचाव पथकाला चार जणांचे मृतदेह सापडले असून दोन जणांचा शोध अद्यापही लागलेला नाही.
शेवटचे मोबाईल लोकेशन बनले पुरावा
कारमधील सहा जणांशी सलग संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी तपास सुरू केला. मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनमध्ये ताम्हिणी परिसरातच जीपीएस सिग्नल गायब झाले असल्याचे दिसले. यानंतर पावसामुळे ओलसर झालेला घाट परिसर तपासण्यासाठी प्रशासन, स्थानिक पथके आणि वन्यजीव रेस्क्यू टीम यांनी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली.
हेही वाचा – नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, पाच जण जखमी
खडकाळ उतारावरून रोप्सच्या साहाय्याने रेस्क्यू
खोल दरी आणि अवघड उतारामुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरली. रोप्सचा वापर करून पथक दरीत उतरले असता थार कारचे चेंदामेंदा झालेले अवशेष आणि चार जणांचे मृतदेह आढळले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. उर्वरित दोन प्रवाशांचा शोध घेण्यासाठी ड्रोनसह विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
दोन दिवसानंतर उघडकीस आला अपघात
अपघात घडून दोन दिवस उलटून गेले तरी अंधारामुळे आणि दरीत खोलवर ठिकाणी कार अडकून असल्याने कोणालाही दुर्घटनेची कल्पना आली नव्हती. स्थानिकांकडून या अपघाताबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


