Thane court hearing On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या 2008 मधील जुन्या खटल्यासंदर्भात आज (11 डिसेंबर) ठाणे न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या समोर राज ठाकरे प्रत्यक्ष हजर राहिले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने विचारले की, तुम्हाला गुन्हा कबूल आहे का? यावर राज ठाकरे यांनी ठामपणे मला गुन्हा कबूल नाही असे उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी न्यायालयाने प्रकरण जलद गतीने निपटण्याची तयारी दर्शवली. “तुम्ही सहकार्य केलं तर हा खटला एका महिन्यात संपेल; पुढील तारखांना तुम्हाला प्रत्यक्ष येण्याचीही गरज नाही, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी व्यक्त केले. राज ठाकरे यांच्या कायदेशीर बाजूचे प्रतिनिधित्व ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी केले.
कोर्टात नेमंक काय घडलं?
या जुन्या प्रकरणातील इतर सात सह-आरोपी देखील आजच्या सुनावणीत उपस्थित होते. मनसेचे वरिष्ठ नेते नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे, अविनाश जाधव यांचीही कोर्टात हजेरी होती. न्यायालयाने प्रकरण जलदगतीने निकाली काढण्याचा संकेत दिल्यानंतर सुनावणीला विशेष महत्त्व मिळाले.
प्रकरणाची पार्श्वभूमी
हा खटला तब्बल 17 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांवर आधारित आहे. 2008 साली रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेदरम्यान उत्तर भारतीय उमेदवारांची संख्या मोठी असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मराठी तरुणांना न्याय मिळावा या उद्देशाने घेतलेल्या या आक्रमक आंदोलनादरम्यान कल्याण रेल्वे पोलीस हद्दीत मारहाण आणि उत्तेजक भाषण केल्याचा आरोप राज ठाकरे आणि इतर कार्यकर्त्यांवर करण्यात आला होता. हा खटला प्रथम कल्याण कोर्टात चालत होता; मात्र काही काळापूर्वी तो ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. त्याच प्रकरणाची आजची सुनावणी होती.
दरम्यान, कोर्टाने एका महिन्यात निकाल देण्याचा अप्रत्यक्ष संकेत दिल्यामुळे या प्रकरणाच्या भवितव्याबाबत आता सर्वांची उत्सुकता वाढली आहे. मनसेसाठीही ही सुनावणी महत्त्वाची मानली जात असून पुढील तारखांवर न्यायालय कोणत्या दिशेने निर्णय नेईल, याकडे लक्ष लागले आहे.


