Pune Mumbai Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर पटली. ही घटना काल (मंगळवारी, ता ३) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हा टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना आडोशी बोगद्याजवळील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळच टँकर उलटल्याने मोठा अपघात टळला असला, गॅस गळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मध्यरात्रीपासून एका लेन वरुन वाहतूक सुरु करण्यात आली. मुंबई वरून पुणे जाणाऱ्या मार्गीकेवर एक्सप्रेस वे आणि जुन्या मुंबई- पुणे हायवेवर वाहतूक कोंडी सुरू झाली आहे, ती अद्यापही कमी झालेली दिसत नाहीये, मुंबई -पुणे एक्सप्रेसवर जाणारी जड वाहणे कळंबोलीपासून बाजूला लावण्याच्या सुचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत. आज (४ फेब्रुवारी) संध्याकाळपर्यंत हीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जवळपास २२ ते २३ तास उलटूनही अद्याप प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
अद्यापही मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरती भीषण वाहतूक कोंडी दिसून आली आहे. एक्स्प्रेस वे वर काल टँकर अपघातामुळे गॅस गळती झाली आहे. आज दुपारी दोन वाजले तरीही 25 किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या, पुण्याकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे. एक्सप्रेस वे आणि जुना मुंबई-पुणे हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. एक्स्प्रेस वे वर खालापूर टोल नाक्यापासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, जुन्या मुंबई-पुणे हायवेवर पुणे मार्गीकेवर खोपोलीपासून कोंडी झाली आहे. संध्याकाळ पर्यंत हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
वाहतूक कोंडीत फसलेल्या प्रवाश्यांचा संताप, कोण-कुठं निघालंय
पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील टँकर अपघातामध्ये गॅस गळती झाली गेल्या 16 ते 17 तासापासून दोन्हीही महामार्गावर वीस ते पंचवीस किलोमीटरच्या वाहतुकीच्या रांगा लागलेल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, काहींना विमानतळावर पोहोचायचं आहे, तर काहींना दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी पोहोचायचं आहे, तर काहींना आपला माल मुंबई आणि विमानतळावर पोचवायचा आहे, मात्र या सर्वांना या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या घटनेनंतर लागणारा वेळ आणि इतर गोष्टींचा अभाव यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
दोन्ही पुणे-मुंबई महामार्गावर 20 किलोमीटरच्या रांगा!
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गॅस टँकर पलटी झाला आहे, या घटनेला 16 तास उलटले तरी वाहतूक अद्याप ही ठप्प आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग असो की जुना पुणे-मुंबई महामार्ग असो या दोन्ही मार्गावर 20 ते 22 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतूक बदल
आडोशी बोगद्याजवळील गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेसवे आणि जुना हायवे दोन्ही ठप्प आहेत. प्रवाशांनी कृपया खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा:
१. ताम्हिणी घाट मार्ग: पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)
२. माळशेज घाट मार्ग: पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त)
कृपया लोणावळा-खंडाळा मार्ग पूर्णपणे टाळावा. प्रवासाचा वेळ ३-५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे.


