Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारी एक खळबळजनक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, जरांगे समर्थकांमध्ये संतापाची लाट आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय आहे?
व्हायरल झालेल्या या संभाषणात मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आणि वाल्मीक कराड यांचे समर्थक असल्याचा दावा केला जाणारा एक व्यक्ती यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक पाहायला मिळते. समोरची व्यक्ती अत्यंत आक्रमक भाषेत “मी स्वतः मनोज जरांगे यांना गोळ्या घालीन,” असे म्हणताना ऐकू येत आहे. केवळ जरांगे पाटीलच नव्हे, तर त्यांच्या समर्थकालाही जिवे मारण्याची धमकी या संभाषणात देण्यात आली आहे. यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या नावाचा उल्लेख करत समर्थकाला गप्प राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपची सत्यता किंवा त्यातील आवाजाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
या प्रकरणाने बीडमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. यापूर्वीही मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आपल्या हत्येसाठी सुपारी देण्यात आल्याचा दावा जरांगे यांनी केला होता, ज्यावरून काही संशयितांना अटकही करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा वाल्मीक कराडच्या नावाचा उल्लेख करून देण्यात आलेल्या या धमकीमुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
पोलीस तपासाकडे लक्ष
या क्लिपमधील संभाषण करणारे दोन व्यक्ती नेमके कोण आहेत? हे संभाषण कधी झाले? आणि ही क्लिप जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. जरांगे समर्थकांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.


