HSC Exam : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात एक काळीज पिळवटून टाकणारी आणि तितकीच प्रेरणादायी घटना घडली आहे. घरात वडिलांचे पार्थिव ठेवलेले असताना १८ वर्षीय जान्हवी राहांगडाले हिने डोळ्यांत अश्रू घेऊन बारावीची परीक्षा दिली. वडिलांच्या निधनाचे दु:ख मनात दाबून तिने इंग्रजीचा पेपर पूर्ण केला.
जान्हवी ही तुमसर तालुक्यातील आंबागड येथील रहिवासी आहे. तिचे वडील हौशीलाल राहांगडाले (वय ५१) यांचे सोमवारी अपघाती निधन झाले. दुपारी सायकलने घरी परतत असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने राहांगडाले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
घरात शोककळा पसरलेली, नातेवाईक आणि गावकरी अंत्यसंस्कारासाठी जमलेले, दारात वडिलांचे पार्थिव… अशा परिस्थितीत जान्हवीसमोर मोठा प्रश्न उभा होता. मात्र “मुलीने शिकून मोठं व्हावं” हा वडिलांचा शब्द आठवत तिने धैर्याने परीक्षेला जाण्याचा निर्णय घेतला.
परीक्षा केंद्रावर बसल्यावर तिच्या डोळ्यांसमोर वारंवार वडिलांचा चेहरा येत होता. हात थरथरत होते, मन व्याकुळ झाले होते. तरीही वडिलांच्या स्वप्नासाठी तिने स्वतःला सावरत पेपर पूर्ण केला. पेपर संपल्यानंतर मात्र तिच्या अश्रूंचा बांध फुटला. दुपारी घरी परतल्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जान्हवीच्या या धैर्यपूर्ण निर्णयामुळे संपूर्ण परिसरात तिच्या जिद्दीची चर्चा सुरू आहे. दु:खाच्या डोंगराखाली दबलेले असतानाही शिक्षणाला प्राधान्य देत तिने दिलेला हा पेपर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


