गोंदिया : महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील पुराडा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतशिवारातील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (५ ऑक्टोबर) सायंकाळी सुमारास घडली असून, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या प्रयत्नाने रात्री उशिरा तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे पुराडा गावात शोककळा पसरली असून, मृतकांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुराडा गावातील शेतशिवारात असलेल्या एका खोल शेततळ्याजवळ ही दर्दनाक घटना घडली. अभिषेक आचले (वय २०), आदित्य बैस (वय १६) आणि तुषार राऊत (वय १८) हे तिघेही गावातील स्थानिक तरुण असून, सायंकाळी मित्रांसोबत मजेत वेळ घालवण्यासाठी तळ्यात पोहायला गेले होते. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.
एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना तिघेही पाण्यात अडकले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, पण अंधारामुळे रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढता आले नाहीत.
रात्री १० वाजताच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. तिघांचे मृतदेह देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोस्टमॉर्टेम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सध्या पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.


