सोलापूर : पुण्यातील 19 वर्षीय आयुष कोमरकर याच्या गोळीबारात हत्येची घटना ताजी असतानाच, सोलापूरच्या टेंभुर्णी परिसरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. टेंभुर्णीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वेणेगाव येथील कला केंद्रात मंगळवारी (9 सप्टेंबर) रात्री गाणी लावण्याच्या किरकोळ वादातून दोन गटांमध्ये भांडण झाले. याचे रूपांतर मोठ्या राड्यात झाले, आणि एकाने रिव्हॉल्व्हर काढून गोळीबार केला.
या गोळीबारात पंढरपूरजवळील वाखरी गावचा रहिवासी देवा कोठावळे (वय 32) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डाव्या मांडीत गोळी लागली असून, त्याच्यावर टेंभुर्णीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
टेंभुर्णी येथील वेणेगावातील कला केंद्रात मंगळवारी रात्री तरुणांच्या दोन गटांमध्ये गाणी लावण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, एका गटातील व्यक्तीने रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी देवा कोठावळे याच्या डाव्या मांडीत घुसली, ज्यामुळे परिसरात गोंधळ उडाला.
गोळीबाराची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. काही संशयित फरार झाल्याचेही समजते.
या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे, परंतु संशयितांचे नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे.


