सातारा : पुणे-बेंगळुरू महामार्गावर कराडजवळील वाठार गावाच्या हद्दीत सोमवारी (१ डिसेंबर) सकाळी मोठा अपघात झाला. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या पिंपळगाव बसवंत येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांची सहल बस सुमारे २० फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये ४० ते ४५ विद्यार्थी व शिक्षक होते.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन जीवावर उदार होऊन बचावकार्य केले. बस दरीत उलटी झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेर काढणे अत्यंत जोखमीचे होते, तरीही ग्रामस्थ व बचाव पथकाने थरारक प्रयत्न करून सर्वांना बाहेर काढले.
प्राथमिक माहितीनुसार, ५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत तर १५ पेक्षा अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींना त्वरित कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बस चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कराड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. सहलीचा आनंद घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक हे संकट कोसळल्याने पालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.


