सोलापूर: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीपूर्वीच आता महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती सुरु झाली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीतून मोठ्या प्रमाणात नेतेमंडळी महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकेमकांच्या विरोधात लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका लढवलेले नेतेमंडळी आता महायुतीचे भागीदार झाले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर निवडणुका लढवताना काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे.
विधानसभा निवडणूका पार पडल्यानंतर सध्या महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. भाजपसह एकनाथ शिंदे शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश दिले जात आहेत. त्यामुळे सध्या प्रवेशसोहळे होताना दिसत आहेत. त्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षात चढाओढ लागली आहे. लोकसभेला भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना दिलीप माने, अमर पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे यांनी आपापल्या तालुक्यातून विरोध केला होता.
त्यांनी त्यावेळी काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांना मदत केली होती. विधानसभा निवडणुकीत सिद्धाराम म्हेत्रे हे भाजपचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टींविरोधात लढले आहेत, तर दक्षिणमधून अमर पाटील हे भाजपाच्या सुभाष देशमुख यांच्या विरोधात लढले आहेत. सुरेश हसापुरे यांनी सुभाष देशमुख यांच्या विरोधातही प्रचार केला आहे. मात्र आता हे सर्व विरोधी नेते महायुतीत येण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. यामधील अमर पाटील शिंदे यांच्या सेनेत आले आहेत. त्यांना जिल्हा प्रमुखही केले आहे, तर दुसरीकडे सिद्धाराम म्हेत्रे हे ५ जून रोजी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तर सुरेश हसापुरे हे भाजप, तर दिलीप माने हे अजितदादा यांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे.
शहर मध्यमधून तौफीक शेख यांनी भाजपाच्या देवेंद्र कोठे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ते आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत. बड्या नेत्याला प्रवेश देत असताना महायुतीचे हित न पाहता केवळ पक्षाचे हित पाहून प्रवेश दिला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जशी जवळ येईल, तसे आगामी काळात अनेक दिग्गज महायुतीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात या निमित्ताने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीला फायदा होणार ?
आगामी काळात महायुती म्हणून जर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असतील, तर जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात वाद पाहिला मिळतील आणि याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीला होणार आहे. जर महायुतीमधील सर्वच पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेल्यास हेच नेते पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभारतील. त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


