पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागा नदीवरील आहिल्या पुलावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर दोन ट्रॉल्यांसह पुलावरून थेट नदी पात्रात कोसळला. त्याचवेळी ट्रॅक्टरवरून खाली पडलेला कंटेनरही नदीत कोसळल्याने अपघात अधिकच गंभीर झाला.
कर्नाटक येथून ऊसतोड मजूर घेऊन ट्रॅक्टर करकमकडे निघाला होता. ट्रॅक्टर सुरू होण्याच्या तयारीत असतानाच पुलाचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर आणि कंटेनर एकाच ठिकाणी आले आणि काही क्षणांतच दोन्ही वाहने पुलाखाली कोसळली. या अपघातात महादेव दिलीप काळे (५०) आणि राजू रमेश चव्हाण (४०) या दोन ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत जवळपास ८ ते १० जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. रात्रीच्या अंधारामुळे आणि नदी पात्रात वाहनं अडकल्याने बचावकार्यात सुरुवातीला अडचणी आल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर आणि कंटेनर बाहेर काढण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.


