MVA Seat Sharing: आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापुरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला कडवे आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीने आपल्या १०२ जागांचे गणित स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, या आघाडीत राज ठाकरे यांच्या मनसेचाही समावेश झाला असून त्यांना ठाकरे गटाच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहेत.
जागावाटपाचा ‘सोलापूर फॉर्म्युला’ काय?
आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागांचे वाटप खालीलप्रमाणे निश्चित झाले आहे:
- काँग्रेस: ४५ जागा (सर्वात मोठा पक्ष)
- शिवसेना (UBT): ३० जागा
- राष्ट्रवादी (शरद पवार गट): २० जागा
- माकप (CPM): ०७ जागा
- एकूण जागा: १०२
या आघाडीत ‘आप’ आणि ‘वंचित’ला सोबत घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी स्पष्ट केले.
ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस; नेत्यांमध्ये जुंपली
जागावाटपाची घोषणा होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये वादाची ठिणगी पडली. काँग्रेसला जास्त जागा मिळाल्याने शहर प्रमुख अजय दासरी यांना शिवसैनिकांनी धारेवर धरले. उत्तर विधानसभा शहर प्रमुख महेश धाराशिवकर आणि दासरी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. एकमेकांना ‘बघून घेण्याची’ भाषा वापरल्याने पत्रकार परिषदेच्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मनसेला शिवसेनेच्या कोट्यातून जागा
ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी सांगितले की, मनसेने ५ जागांची मागणी केली आहे. या जागा शिवसेनेच्या (ठाकरे गट) ३० जागांच्या कोट्यातून दिल्या जातील. निवडून येण्याची क्षमता हाच एकमेव निकष लावून हे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. तथापी, महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ ४ जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, नरसय्या आडम मास्तर, ओमराजे निंबाळकर आणि चंद्रकांत खैरे यांसारखे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीला (शरद पवार गट) खिंडार
एककीकडे आघाडीची चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाला सोलापुरात मोठे भगदाड पडले आहे. माजी महापौर यू.एन. बेरिया आणि नलिनी चंदेले या दोन ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.


