करमाळा(पुणे) : जेऊर रेल्वे स्थानकावर सोलापूर-अजमेर एक्स्प्रेस या साप्ताहिक रेल्वे गाडीस थांबा मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा अहवाल सोलापूर मंडलने पुढील कार्यवाहीसाठी मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवला आहे. यामुळे करमाळा तालुक्यासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार नारायण पाटील यांनी सोलापूर-अजमेर एक्स्प्रेस गाडीला जेऊर रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, या मागणीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल घेत सोलापूर विभागाने सकारत्मक प्रतिसाद दिला आहे.
याबाबतची माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी आमदार नारायण पाटील यांना एका लेखी पत्राद्वारे कळवली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आमदार पाटील यांच्या मागणीनुसार जेऊर रेल्वे स्थानकावर अजमेर-सोलापुर-अजमेर या गाडीचा थांबा दिला जावा का? याची सखोल पडताळणी केली. अहवालानुसार, पाटील यांनी केलेली मागणी व्यवहार्य असल्याचे दिसुन आले आहे. तसेच पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी हा अहवाल मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे पाठवल्याचे योगेश पाटील सांगितले. यामुळे जेऊर रेल्वे स्थानकावर सोलापूर-अजमेर एक्स्प्रेसला थांबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


