BJP leader Bablu Yadav firing news in Bhagalpur : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते विवेकानंद प्रसाद उर्फ बबलू यादव यांच्यावर कुख्यात गुन्हेगार सूरज तांती आणि त्याच्या साथीदारांनी दिवसाढवळ्या गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. बरारी पोलीस स्टेशन हद्दीतील टीएनबी लॉ कॉलेज लेन येथे शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
यादव हे भाजपचे स्थानिक नेते असून, ते तिलकमांझी चौकाजवळील त्यांच्या निवासस्थानी होते. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बबलू यादव आपल्या घराबाहेर फिरत असताना सूरज तांती आणि त्याचे चार साथीदार अचानक दाखल झाले. त्यांनी घरात घुसून धाडधाड दोन गोळ्या झाडल्या त्यानंतर ते जमिनीवर पडले. हल्लेखोरांनी तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला.
भागलपूरचे डीएसपी अजय कुमार चौधरी यांनी शनिवारी (२५ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना सांगितले की, पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे. एका आरोपीला अटक करण्यात यश आले असून, उर्वरित चार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस तुटून पडले आहेत.
जुन्या वादातून हल्ला
पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वैयक्तिक वादातून झाल्याचे सूचक पुरावे मिळाले आहेत. डीएसपी चौधरी यांनी स्पष्ट केले की, काही दिवसांपूर्वी स्थानिक फळ विक्रेते दिवानंद आणि सूरज तांती यांच्यात तिलकमांझी परिसरात भांडण झाले होते. या भांडणाची माहिती बबलू यादव यांनी पोलिसांना दिली होती, यामुळे दिवानंदला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी अटक केली. यामुळे सूरज तांतीला राग आल्याचे आणि त्याने हा बदला घेण्यासाठी हल्ला केल्याचा संशय आहे.


