Delhi Government : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्ली सरकारने अनेक मोठे निर्णय जाहीर केले आहेत. वाढते इंधन संकट, प्रदूषण आणि खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने ‘माझा भारत, माझे योगदान’ मोहिमेला पाठिंबा देत प्रशासनात महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आठवड्यातून दोन दिवस सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, सरकारी वाहनांचा वापर मर्यादित केला जाणार असून पुढील सहा महिन्यांसाठी कोणतीही नवीन सरकारी वाहने खरेदी केली जाणार नाहीत.
सरकारचे मोठे निर्णय
- आठवड्यातून दोन दिवस वर्क फ्रॉम होम
- सरकारी वाहनांचा वापर कमी
- पुढील ६ महिने नवीन वाहन खरेदीवर बंदी
- निम्म्या सरकारी बैठका ऑनलाइन
- मंत्र्यांचे परदेश दौरे वर्षभरासाठी रद्द
सरकारच्या म्हणण्यानुसार, या निर्णयांमुळे इंधन बचत, वाहतूक कोंडी कमी होणे आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच सरकारी खर्चातही मोठी बचत अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचलेला निधी कल्याणकारी योजनांसाठी वापरण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
दरम्यान, ‘माझा भारत, माझे योगदान’ या मोहिमेतून नागरिकांनी पाणी, वीज आणि इंधन बचतीसारख्या छोट्या गोष्टींमधून देशासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


