नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली समूहाच्या च्यवनप्राशच्या जाहिरातीवर अंतरिम बंदी घातली आहे. आपल्या कंपनीच्या च्यवनप्राशबाबत पतंजलीकडून दिशाभूल करणारी आणि नकारात्मक जाहिरात केली जात असल्याचा आरोप डाबर इंडियाने याचिकेद्वारे केला होता. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे.
पतंजलीने आपल्या जाहिरातीमध्ये आपल्याशिवाय आयुर्वेद आणि शास्त्रयुक्त पद्धतीने कोणीही दुसरे च्यवनप्राश बनवू शकत नसल्याचा दावा केलेला आहे. यावर डाबर इंडियाने आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पतंजलीच्या या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी. तसेच भरपाई म्हणून दोन कोटी रुपयांची मागणी डाबर इंडियाकडून करण्यात आली आहे.
यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने पतंजलीची जाहिरात थांबवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पतंजलीला आता च्यवनप्राशसंबंधीची जाहिरात दाखवता येणार नाही. पतंजलीकडून आपल्या जाहिरातीमध्ये इतर च्यवनप्राश ब्रँडचे अवमान केले जात होते, असे डाबर इंडियाच्या वकिलांनी म्हटले. दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वीदेखील रामदेव बाबांना ‘शरबत जिहाद’ वरून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते.


