बंगळूर : कर्नाटकातील गदग तालुक्यातील हरलापूर क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग ६७ वर झालेल्या भयानक अपघाताने सर्वांनाच हादरवले आहे. अतिवेगामुळे कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकाला धडकली, त्यानंतर ती गोवा राज्याच्या कदंबा बसला जोरदार धडकली. या अपघातात दोन पोलिस कॉन्स्टेबलांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात रवी नेल्लूर (वय ४३) यांच्यासह मोटारीमध्ये असलेले पोलिस कॉन्स्टेबल (Karnataka Police Accident) अर्जुन नेल्लूर (वय २९) आणि वीरेश उप्पार (वय ३१) यांचा मृत्यू झाला. मृत्यूमुळे दोन कुटुंबांवर शोककळा कोसळली असून, दोघाही कॉन्स्टेबलचे लग्न ठरले होते आणि ते लवकरच नववधूचे स्वागत करणार होते.
नेमकं काय घडलं?
गुरुवार सायंकाळी गदगकडे जाणाऱ्या एका कारने (MH-नंबर) हॉसपेटेकडे जाणाऱ्या कदंबा बसला जोरदार धडक दिली. कार दुभाजक ओलांडून उलट्या दिशेने धावली आणि बसच्या समोर येऊन धडकली. धडके इतकी प्रचंड होती की, कारचे तुकडे रस्त्यावर विखुरले गेले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अतिवेग आणि चालकाचे निष्काळजीपण हे अपघाताचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. बसचालक आणि कंडक्टर यांनी सांगितले की, कार अतिशय वेगाने चालवली जात होती, यामुळे अपघात टाळणे अशक्य झाले.
दोघेही कॉन्स्टेबल सात वर्षांपासून पोलिस विभागात सेवा देत होते. दुखद म्हणजे, अर्जुन आणि इरन्ना यांचे लग्न येत्या कार्तिक महिन्यात ठरले होते. कुटुंबीय आणि सहकाऱ्यांमध्ये शोकाची लहर उसळली असून, पोलिस विभागाने त्यांच्या शवयात्रेसाठी विशेष व्यवस्था केली आहे.
गदग ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धावत जाऊन तपास केला आणि मृतदेहांना गदग येथील जे.आय.एम.एस. रुग्णालयात नेण्यात आले. पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येतील. गदग ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.


