Ladki Bahina Yojana : लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत असते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक मदत देणारी ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आता मध्य प्रदेशमधील एका मंत्र्याच्या विधानामुळे नवा वाद उफाळून आला आहे.
मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यात आयोजित एका सरकारी कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री करण सिंह वर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरकारी कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्यास लाडकी बहीण योजनेतील लाभ थांबवले जाऊ शकतात, असा इशारा त्यांनी थेट व्यासपीठावरून दिला.
खुल्या व्यासपीठावरून थेट इशारा
सिहोर जिल्ह्यातील नापलाखेडी आणि धामांडा गावांमध्ये नवीन उप-आरोग्य केंद्रांच्या उद्घाटनासाठी आयोजित कार्यक्रमात मंत्री करण सिंह वर्मा सहभागी झाले होते. धामांडा गावातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, या गावातील ८९४ लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत, मात्र कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती अत्यंत कमी आहे.
यावर नाराजी व्यक्त करत मंत्री म्हणाले, “एक दिवस सर्व लाडक्या बहिणींना कार्यक्रमासाठी बोलावले जाईल. ज्या येणार नाहीत, त्यांची नावे योजनेतून काढून टाकण्यासाठी अहवाल पाठवला जाईल.” या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे.
सामाजिक योजनेला कार्यक्रमाशी जोडण्यावर आक्षेप
मंत्र्यांच्या या वक्तव्यावरून टीकेचा सूर वाढत आहे. कारण लाडकी बहीण योजना ही सामाजिक कल्याणकारी योजना असून, कोणत्याही सरकारी कार्यक्रमातील उपस्थितीशी तिचा थेट संबंध नाही, असा आक्षेप घेतला जात आहे.
याच भाषणात त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करत, “पूर्वी काँग्रेसच्या काळात पैसे मिळायचे, आता सरकार स्वतः पैसे देत आहे. पंतप्रधान शेतकऱ्यांसाठी गहू पाठवत आहेत, खात्यात पैसे जमा होत आहेत, पण लोक लक्ष देत नाहीत,” असंही विधान केलं. त्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आरोग्य सुविधांचे उद्घाटन हा होता मुख्य उद्देश
दरम्यान, या कार्यक्रमाचा मुख्य हेतू ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा मजबूत करणे हा होता. मंत्र्यांच्या हस्ते नापलाखेडी गावात ५६.०९ लाख रुपये खर्चून उभारलेल्या उप-आरोग्य केंद्राचे आणि धामांडा गावात ६५ लाख रुपये खर्चून बांधलेल्या आयुष्मान आरोग्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामीण नागरिकांना उपचारांसाठी दूर जावे लागू नये, यासाठी राज्य सरकार सातत्याने आरोग्य सेवा सुधारण्यावर भर देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


