Indapur Election : इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून तयारी पूर्ण केली आहे. तालुक्यात ४०० मतदान केंद्रांवर ३ लाख २१ हजार २ मतदार मतदान करण्यासाठी पात्र असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.
तालुक्यात ४०० ठिकाणी मतदान केंद्र
इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ८ गट आणि पंचायत समितीचे १६ गणांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यात ४०० ठिकाणी मतदान केंद्र तयार केले असून, सर्व मतदान केंद्रावर सर्व व्यवस्था पुरविण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीकरीता व्हीलचेअरची सुविधा केली आहे.
तसेच गलांडवाडी नंबर एक येथे महिला मतदान केंद्राअंतर्गत सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेकर वस्ती वनगळी येथे आदर्श मतदान केंद्र, तर लुमेवाडी येथे परदानशील मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ४१ उमेदवार आणि पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.


