अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरात घरी आलेल्या इलेक्ट्रॉनिक सर्किट व बॅटरीच्या पार्सलचा स्फोट झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. साबरमती भागात राहणारे बलदेव सुखडिया यांच्या घरी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास एक पार्सल आले. बलदेव यांनी ते हातात घेताच त्यातून धूर निघाला. काही क्षणांतच त्याचा स्फोट झाला. यात बलदेव व त्यांचा भाऊ जखमी झाला, अशी माहिती पोलीस अधिकारी नीरज बडगुजर यांनी दिली.
या घटनेनंतर पोलिसांनी पार्सल आणून देणारा आरोपी गौरव गढवीला अटक केली आहे. या स्फोटात तो किरकोळ जखमी झाला आहे. सुखडिया कुटुंबासोबतच्या वादामुळे त्यांच्या घरी रिमोट संचलित इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटरी व ब्लेड पाठवून स्फोट घडविल्याचा खुलासा प्राथमिक चौकशीतून समोर आला आहे.


