Rajdhani Express : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (क्रमांक 12431) मध्ये रविवारी सकाळी भीषण प्रकार घडला. कोटा रेल्वे विभागातील रतलाम जिल्ह्यातील अलोट स्टेशनजवळ या ट्रेनच्या बी१ एसी डब्यात अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली.
सकाळी सुमारे ५:३० वाजता लुनी रिछा आणि विक्रमगड अलोट स्टेशनदरम्यान ही घटना घडली. गार्डच्या लक्षात डब्यातून धूर येत असल्याचे आल्यावर त्यांनी तात्काळ चालकाला सूचना दिली. त्यानंतर ट्रेन त्वरित थांबवण्यात आली.
या डब्यात एकूण ६८ प्रवासी प्रवास करत होते. रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत अवघ्या १५ मिनिटांत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागलेला डबा वेगळा करण्यात आला असून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. घटनेनंतर कोटा रेल्वे विभाग, अग्निशमन दल आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे दिल्ली–मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने लवकरच सेवा पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.


