नवी दिल्ली: स्वतःच्या घरात कोट्यवधी रुपयांची रोकड आढळल्याप्रकरणी अंतर्गत चौकशी समितीचा अहवाल फेटाळून लावण्याची मागणी करणारे न्या. यशवंत वर्मा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. न्या. वर्मा यांची वर्तणूक अविश्वसनीय असून तुम्ही आमच्यापुढे हजर का झालात? अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने न्या. वर्मा यांना फटकारले आहे.
घरात मोठ्या प्रमाणावर रोकड आढळल्याप्रकरणी अंतर्गत चौकसी समितीने न्या. यशवंत वर्मा यांना दोषी ठरवले. या समितीच्या अहवालाविरुद्ध न्या. वर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्या. दीपांकर दत्ता व न्या. ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने न्या. वर्मा यांनी तिखट प्रश्न विचारले. तुम्ही (वर्मा) तपास समितीपुढे का हजर झालात? तुम्ही तुमच्या निर्दोषत्वाला समितीपुढेच आव्हान का दिले नाही? यापूर्वीच तुम्ही आमच्याकडे धाव का घेतली नाही? अशा सवालांची सरबत्ती खंडपीठाने केली. जर एखाद्या न्यायमूर्तीने गैरवर्तन केल्याचे सिद्ध करणारे दस्तावेज सरन्यायाधीशांपुढे सादर केले, तर ते राष्ट्रपती व पंतप्रधानांना सूचित करू शकतात.


