बारामती: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्याची न्यायालयीन चौकशी केली जाईल. मास्टरमाइंडला सोडणार नाही, अशा अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पक्ष निरीक्षक सुरेश पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, बारामतीकरांनी दिलेल्या मताधिक्याने विधानसभेत गेल्यावर छाती गर्वाने फुगते. मी राज्यातील जनतेला शब्द देतो की, ध्येयधोरणांची प्रतारणा करणार नाही, सर्वधर्मसमभाव असे वागणार आहे. यासाठी राष्ट्रवादी पक्ष वाटचाल करेल, संघर्ष करणे त्यासाठी लढणे हे राष्ट्रवादीचे धोरण आहे. बारामतीच्या विकास हाच आमचा ध्यास आहे. आजपर्यंत बारामती राज्यातील एक नंबर होती. आता आपल्याला देशात एक नंबर करायची आहे, असे सांगत विरोधकांकडून नरेटीव सेट केला जातोय. मात्र मी आपणास शब्द देतो जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार नाही.
लोकसभेला फटका बसल्यावर आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही, लाडकी बहीण योजना महिलांमध्ये प्रसिद्ध झाली, लाइट बिल माफ केले, विरोधकांनी यावर टीका केली. विधानसभेचा निकाल महाविकास आघाडीला पचला नाही आणि ईव्हीएमच्या नावाने टीका सुरू केली, बारामतीकरांनी विधानसभेला मला जे मताधिक्य दिले, त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. कामाच्या बाबतीत मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही देतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकाने जबाबदारी उचलली पाहिजे
प्रत्येकाने जबाबदारी उचलली पाहिजे. एकटा २४ तास राबून उपयोग नाही. मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, केंद्राची तीन कोटी घरांची योजना असून त्यातील दहा टक्के घरे राज्यात आणणार आहे. बेघरांना घर देण्याची आमची संकल्पना आहे. तालुक्यात पाण्याच्या बाबतीत मी कोणाला वंचित ठेवणार नाही. बंद पाइपलाइनला विरोध करू नका, असे आवाहन त्यांनी केले.


