सातारा: महायुती सरकारमधील खाते वाटपातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही उघड होत आहे. त्यांना मुख्यमंत्री, गृहमंत्रीपद न मिळाल्याने त्यांचा चेहरा अद्यापही उतरलेलाच दिसत आहे. ते रविवारी अचानक महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावी परतले आहेत.
राज्यात महायुती सरकार बहुमताने सतेत आले. त्यात भाजपचा वरचष्मा राहिला. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार, असे स्पष्ट झाले. त्यापासून एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढली आहे. मुख्यमंत्रीपद गेले तरीही त्यांना गृहमंत्रीपद हवे असल्याची चर्चा सुरू होती. मात्र ते मिळत नसल्याने त्यांची नाराजी वाढली होती. यादरम्यान त्यांनी दरे गावची वाट पकडली होती. नोव्हेंबरअखेरीस तब्येत बिघडल्याने ते विश्रांतीसाठी दरे गावी आले होते. तब्येत ठीक झाल्यानंतर पुन्हा ते मुंबईला परतले. मात्र या घडामोडींमुळे सत्तास्थापनेला विलंब झाला होता.
महायुती सरकारमध्ये शनिवारी रात्री खातेवाटप झाले. यात उपमुख्यमंत्री शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती मिळाली आहेत. शिवाय अनेक आमदारांना खाती न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करणे सुरू केले आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांनी ‘श्रद्धा व सबुरी’चा सल्ला दिला आहे. दुसरीकडे मात्र अचानक त्यांनी आपल्या दरे या गावी येणे पसंत केले आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता हेलिकॉप्टरने ते व खा. श्रीकांत शिंदे दरे गावी दाखल झाले. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी बोलणे टाळणे. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी दिसून येत होती.
प्रसन्न… नाराज..
एकनाथ शिंदे हे दरे या मूळ गावी येतात तेव्हा त्यांचा चेहरा नेहमीच प्रसन्न पाहण्यास मिळतो. दरवर्षी ते वेळात वेळ काढून गावी येतातच. सध्या त्यांचे गावी येणे वाढले आहे. मुख्यमंत्री झाल्यानतरही ते सातत्याने गावी आले होते. आता पुन्हा सतेत आल्यानंतरही ते गावी आले. मात्र, या दोन्हीही वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट जाणवत होती.


