मुंबई: राजकीय सत्ता संघर्षातून कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण झालेले शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधूंची रविवारी दादर येथील कौटुंबिक लग्न सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित भेट झाली. यावेळी ठाकरे कुटुंबातील शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित होते. या भेटीमुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या राजकोय मनोमिलनाच्या चर्चाना उधाण आले आहे.
राज्यातील महत्त्वाच्या राजकीय कुटुंबांपैकी एक म्हणून ठाकरे कुटुंब ओळखले जाते. परंतु, राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत नवीन मनसे पक्ष स्थापन केल्यापासून हे कुटुंब दोन पक्षांत विभागले गेले आहे. मात्र दोन्ही ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या पुन्हा एकत्रित यावेत, अशी दोन्ही पक्षांतील कार्यकत्यांकडून वारंवार इच्छा बोलून दाखवण्यात येते. परंतु चर्चेच्या पलीकडे फारसे काही घडत नसल्याचा कार्यकत्यांनाही अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ठाकरे बंधूंनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. या निवडणुकीत वेगवेगळे लढलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले होते, तर मनसेला भोपळाही फोडता आला नाही. राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांनाही पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे वेगवेगळे लढून राजकीय नुकसान करून घेण्यापेक्षा एकत्रित लढून राजकीय ताकद वाढवावी, अशी इच्छा दोन्हीकडील कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. या भेटीत कौटुंबिक नातेसंबंधाच्या पलीकडे कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे समजते. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी तसेच महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आस लावून आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी दादरच्या राजे शिवाजी विद्यालयाच्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूची पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीनंतर राज आणि उद्धव या ठाकरे बंधूच्या राजकीय मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आले आहे. मागील आठवड्यात राज ठाकरे यांनीही रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीवर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली होती.


