NCP Star Campaigners List : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज महापालिका निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली. यामध्ये दिग्गज नेत्यांपासून ते युवा चेहऱ्यांपर्यंत सर्वांना संधी देण्यात आली आहे.
प्रमुख नेत्यांची तोफ धडाडणार
या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः आघाडीवर असून, त्यांच्या सोबतीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्याचा दौरा करणार आहेत. मंत्रिमंडळातील महत्त्वाचे चेहरे असलेले हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, नरहरी झिरवाळ आणि धनंजय मुंडे यांसारख्या आक्रमक नेत्यांवर प्रचाराची मोठी धुरा सोपवण्यात आली आहे.
युवा आणि आक्रमक चेहऱ्यांचा समावेश
पक्षाने केवळ ज्येष्ठ नेत्यांवर विसंबून न राहता अमोल मिटकरी, सूरज चव्हाण, झिशान सिद्दीकी आणि सना मलिक-शेख यांसारख्या तरुण आणि आक्रमक वक्त्यांनाही मैदानात उतरवले आहे. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर या देखील या मोहिमेत सक्रिय असतील. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नेते नवाब मलिक आणि अभिनेते सयाजी शिंदे यांचाही स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगत असताना, दुसरीकडे अजित पवार गटाने जाहीर केलेली ही यादी विरोधकांसाठी मोठे आव्हान मानले जात आहे. महायुतीमधील जागावाटपाची चर्चा सुरू असली, तरी राष्ट्रवादीने आपल्या स्टार प्रचारकांद्वारे प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे.


