नांदेड: काँग्रेस पक्षातच राहा, हा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा सल्ला धुडकावून लावत त्यांचे मेव्हणे, माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
मागील काही महिन्यांपासून खतगावकर, त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा जिल्हाभर सुरू होती. मोठा पक्षप्रवेश सोहळा नरसीमध्ये झाला. पक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर खतगावकर यांनी मागील आठ दिवसांत आपल्या प्रभावक्षेत्रातील प्रमुख कार्यकत्यांशी संवाद साधत त्यांना आपल्या नव्या राजकीय पर्वात सहभागी करून घेतले. खतगावकर आणि पोकर्णा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, डॉ. मोनल पाटील खतगावकर, गणेशराव पाटील करखेलीकर, अशोक पाटील मुगावकर, बाळासाहेब कवळे पाटील, रवी पाटील-खतगावकर, दीपक पावडे, भास्कर पाटील भिलवंडे यांच्यासह मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, उमरी आदी तालुक्यांतील वेगवेगळ्या गावांमधील प्रमुख कार्यकत्यांचा समावेश होता.
प्रवेश नव्हे नवा संकल्प
आजचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ पक्षप्रवेश सोहळा नाही, तर एक नवा संकल्प आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात नवा इतिहास घडवायचा आहे. त्यासाठी हा सोहळा असून खतगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळाले आहे. डॉ. मीनल खतगावकर ही मला मुलीसारखी आहे. पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचाच सन्मान राखला जाईल.
-अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


