विशाखापट्टणम: नवीन कर्णधार आणि नव्याने बांधणी केलेल्या संघासह आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात विजयाने करण्याच्या निर्धारानेच दिल्ली आणि लखनौ संघ एकमेकांशी भिडतील. दिल्ली व लखनौचा कर्णधार अनुक्रमे अक्षर पटेल आणि ऋषभपंतच्या नेतृत्वाचा या लढतीमध्ये कस लागेल.
अक्षर पटेल पहिल्यांदा एखाद्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल. फिरकी आणि फलंदाजीतील योगदानामुळे अष्टपैलू म्हणून तो नावारूपास आला आहे. कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळताना त्याला दोन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी करावी लागणार आहे. दुसरीकडे, गेल्या दोन हंगामांत लखनौचे नेतृत्व करणारा के. एल. राहुल यावेळी दिल्लीकडून खेळत आहे. त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी नसली, तरीही फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्याचे दडपण असेल.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरसह राहुल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी आणि आशुतोष शर्मा यांच्या समावेशाने मधली फळी मजबूत दिसत आहे. गोलंदाजीतही त्यांच्याकडे अक्षर आणि कुलदीप यादव हे दोन अनुभवी फिरकीपटू आहेत. वेगवान गोलंदाजी विभागात मिचेल स्टार्क, टी. नटराजन, मोहित शर्मा, मुकेश कुमार आणि दुष्मंथ चामीरा यांचा समावेश आहे. गत हंगामात बंगळुरूचे नेतृत्व करणारा अनुभवी फलंदाज फॅफ डु प्लेसिस यावेळी दिल्लीकडून उपकर्णधार म्हणून खेळत आहे.
आयपीएल लिलावातील सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंतसाठी (२७ कोटी) लिलावातील मूल्य आणि कर्णधार म्हणून ठेवण्यात आलेला विश्वास सार्थ ठरण्याची दुहेरी जबाबदारी असेल. मागील काही दिवसांपासून त्याचे भारतीय संघातील स्थान डळमळीत झाले आहे. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स करंडंकसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते; पण एकाही सामन्यात खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. यामुळे आयपीएलद्वारे भारतीय संघातील आपले स्थान निश्चित करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. लखनौ संघात परदेशी खेळाडूंची संख्या कमी असून त्यांचे जलदगती गोलंदाजही दुखापतीचा सामना करत आहेत. अष्टपैलू शार्दुल ठाकूरचा दुखापतग्रस्त मोहसीन खानच्या जागेवर समावेश करण्यात आला आहे.


