BJP Internal Conflict: महापालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. प्रभाग ३१ (ड) मधील भाजपचे उमेदवार बाळकृष्ण शिरसाट आणि देवानंद बिरारी यांच्या समर्थकांमध्ये विभागीय कार्यालयातच जोरदार राडा झाला. बिरारी यांनी आपल्या पत्नीसह कार्यालयात प्रवेश केला असता, प्रतिस्पर्धी उमेदवाराने त्यांच्यावर हल्ला केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
देवानंद बिरारी यांचा आरोप आहे की, अर्ज प्रक्रियेसाठी गेले असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर अचानक हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे सिडको विभागीय कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बिरारी यांच्या पत्नीने या घटनेनंतर माध्यमांसमोर येत आपला संताप व्यक्त केला आणि शिरसाट यांना कोणीही मतदान करू नये, असे आवाहन करत मतदारांना साद घातली.
दुसरीकडे, बाळकृष्ण शिरसाट यांनी मात्र असा कोणताही वाद किंवा हल्ला झाला नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या गोंधळानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना कार्यालयाबाहेर काढले. नाशिकमधील या ‘हायव्होल्टेज’ ड्राम्यामुळे महापालिकेची ही लढाई अत्यंत चुरशीची आणि संघर्षाची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


