नवी दिल्ली: पुढील महिन्यात दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वार्षिक परिषदेमध्ये तीन मुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, चंद्राबाबू नायडू आणि रेवंत रेड्डी यांच्यासह देशातील १०० पेक्षा जास्त सीईओ आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. येथील स्विस स्की रिसॉर्ट शहरात २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या पाचदिवसीय वार्षिक परिषदेसाठी नायडू यांचा मुलगा आणि आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश देखील सामील होतील. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, तामिळनाडूचे मंत्री टीआरबी राजा आणि उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश खन्नाही तेथे उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नायडू यांनी दावोसला अनेकदा भेट दिली आहे, तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी या वर्षी जानेवारीमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीतही हजेरी लावली होती. रिलायन्स, टाटा, अदानी, बिर्ला, भारती, महिंद्रा, गोदरेज, जिंदाल, बजाज आणि वेदांत यांसारख्या भारतातील व्यावसायिक समूहातील उच्च अधिकारी सहभागी होणार आहेत. या बैठकीला काही ज्येष्ठ केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे, मात्र त्यांची नावे अद्याप निश्चित केली जात आहेत. अश्विनी वैष्णव, स्मृती इराणी आणि हरदीपसिंग पुरी केंद्र सरकारच्या वतीने मागील वार्षिक बैठकीत सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यापूर्वी या बैठकीत सहभाग घेतला आहे. मात्र या उच्चस्तरीय शिखर परिषदेत त्यांच्या सहभागाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
अमेरिकेतील सत्ताबदल आणि युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील संकटासह विविध भौगोलिक राजकीय आणि व्यापक आर्थिक मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये प्रथमच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वार्षिक बैठकीत भाग घेतला होता. मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनले, तर ट्रम्प २० जानेवारी रोजी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारणार आहेत. ट्रम्प यांचे दुसऱ्यांदा सत्तेवर येणे दावोस येथे चर्चेचा एक प्रमुख विषय असू शकतो.


