भुवनेश्वर : देशात नवे शैक्षणिक धोरण नुकतेच लागू झाले असतानाच विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेत देण्यात यावे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी केले.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आयोजित ‘डीएव्ही युनायटेड फेस्टिव्हल’ मध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान सहभागी झाले. दोन दिवस साजरा होणाऱ्या या फेस्टिव्हलची ‘प्रयोजनासाठी एकता’ ही थीम आहे. या वेळी माध्यमांशी बोलताना मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करीत धर्मेंद्र प्रधान म्हणतात की, बाल वयात विद्यार्थी जी भाषा ऐकतात किंवा बोलतात, तिचा प्रभाव त्यांच्यावर बरीच वर्षे असतो. त्यामुळे मातृभाषेत शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांची टिकात्मक विचारसरणी विकसित होते.
याबाबत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ठळक उल्लेख करण्यात आला आहे. आता या दिशेने ठोस पावले उचलत प्रत्यक्षात आठवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत देण्यात यावे, असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.
‘डीएव्ही युनायटेड फेस्टिव्हल’ मध्ये विविध नाविन्यपूर्ण माहिती देणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. आता शिक्षणमंत्र्यांनी मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी सरकारसुद्धा चौफेर प्रयत्न करीत असून, निश्चितपणे ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, अशी प्रतिक्रिया एसएसी रोबोटिक्स प्रयोगशाळेचे संस्थापक शाक्यसिंह महापात्रा यांनी दिली आहे. दरम्यान, ‘डीएव्ही युनायटेड फेस्टिव्हल’ मध्ये ओडिशातील ५२ विद्यालये आणि असंख्य शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.


