Dhananjay Munde On Walmik Karad: परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने भव्य संयुक्तिक कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात महायुतीच्या उमेदवारांसह परळीच्या विकासावर भर दिला. त्यांनी सांगितले की, “गेल्या एक वर्षापासून परळीला बदनाम करणाऱ्यांना उत्तर देणे महायुतीची जबाबदारी आहे. माझ्या जीवनात कुठलीही निवडणूक सोपी नव्हती. परळीकरांच्या हितासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.” धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, उठसूट आरोप आणि तुतारी घेऊन आलेल्या विरोधकांसोबत सामना करणे आवश्यक आहे. आज 10 महिन्यापासून जगमित्र कार्यालय सुरू आहे. पण आज इथे एक माणूस नाही, असा उल्लेख करत धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या वाल्मिक कराडची आठवण काढली.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी भाषणात नगरपरिषदेच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आणि परळीच्या विकासावर भर दिला. त्यांनी म्हटले, आपल्या इगोला बाजूला ठेवून एकत्र काम केले तर विकास सुनिश्चित होईल. वैद्यनाथ कारखाना सुरू झाला आहे आणि आता फक्त परळीच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
हेही वाचा – Gauri Death Case : गौरी आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; मध्यरात्री पोलिसांनी फास आवळला
मेळाव्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे भाषण परळीतील महायुती कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे ठरले. राजकीय विश्लेषकांच्या मते, या मेळाव्याने निवडणुकीच्या रणभूमीत महायुतीची ताकद दृढ करण्यास मोठा हातभार लावला आहे.


