Prakash Ambedkar News: शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेत आला आहे. कर्जमाफीसाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांनी नागपुरात आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर विरोधक सत्ताधाऱ्यांवर चांगलेच आक्रमक झाल्याच पहायला मिळत आहे. काल शेतकऱ्यांच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “सारखंच फुकटात कसं मिळेल?” असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित केला. त्यावर चांगलच वातावरण तापलं. शेतकऱ्यांनी देखील हातपाय हालवावे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. “राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं तुम्हाला वाटतं का?”, प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर मोठी पोस्ट लिहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान आणि शेतमालाला भावाच्या अभावामुळे अडचणीत आहेत. हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात परंतु, तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही!, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” पण खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? कधीपर्यंत हजारो कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील? अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला?, असा संतप्त प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपच्या जाहीरनाम्यात या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले गेले. पण, वास्तव असे आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही तिघांनी मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना भिक नको आहे, हक्क हवा
अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांना उद्ध्वस्त केले आहे. ६८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. सरकारने मदत जाहीर केली पण, जमिनीवर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला नाही! शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली आणि आता त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या आहेत. तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी, म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे तुम्हाला वाटते का? शेतकऱ्यांना भिक नको आहे, त्यांना त्यांचे हक्क हवे आहेत ! वंचित बहुजन आघाडी तुमच्या शेतकरीविरोधी विधानाचा तीव्र निषेध करते!!, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला.


