Election Commission Office Vandalized: मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या घोषणेआधीच वातावरण तापले असून, मतदार यादीतील कथित त्रुटींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केली. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद काही वेळात होणार असतानाच ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच मनसेचे कार्यकर्ते निवडणूक आयोग कार्यालयात जमले होते. मतदार नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले. मतदार यादीत दुबार नावे, मृत मतदारांची नोंद तसेच मोकळ्या जागांवर इमारती दाखवून मतदार नोंदणी करण्यात आल्याच्या तक्रारी केल्या.
हेही वाचा – Devendra Fadnavis: पुढच्या दोन वर्षात 1 लाख 20 हजार सरकारी नोकऱ्या देणार; CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
अधिकाऱ्यांच्या उत्तरांनी संताप वाढला
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे वारंवार स्पष्टीकरण मागितले. मात्र, ठोस उत्तर न मिळाल्याने आणि केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप करत कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. याचवेळी निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइटही बंद असल्याने संतापाचा उद्रेक झाला आणि अखेर कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार असतानाही जनतेची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी निवडणूकपूर्व आश्वासनांवरही सरकारला लक्ष्य केले. भाजपने लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप एकाही बहिणीच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.


